तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तब्बल 32 वर्षानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे (पाटील) शाळा क्र. दोन या सन 1992 च्या बॅचचे सातवीचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी ईशा हॉटेल येथे पार पडला. नगर परिषद शाळांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा स्नेह मेळावा झाल्याचे सर्व शिक्षकांनी आवर्जून सांगितले. यानिमित्ताने आमचे तिसरी ते सातवी पर्यंत वर्गशिक्षक राहिलेले तानाजी गोंदके सर, तत्कालीन मुख्याध्यापक सूर्यकांत भोसले सर, श्रीमती सुरेखा माने – जाधव बाई, सोपान आल्हाट सर आणि संजय चांदे सर आणि अंकुश माने सर हे उपस्थित राहिले. काही कारणास्तव केंगले सर, जाधव सर हे उपस्थित राहू शकले नाही त्यांना पुन्हा एकदा घरी जाऊन भेट देणार आहे.
यावेळी जुन्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला, सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं तर शाळा म्हटली की आपल्याला आपली प्राथमिक शाळा प्रकर्षाने आठवते त्यानंतर माध्यमिक शाळा आणि मग कॉलेज लाईफ सध्या फक्त दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा म्हणजेच गेट – टुगेदर होत असतात परंतु त्याकाळी बरेच विद्यार्थी परिस्थिती किंवा अन्य कारणाने दहावीच्या आधीच शाळा सोडत असे त्यांना अशा स्नेह मेळाव्याचे कधीच निमंत्रण मिळत नसल्याची खंत असे पण कालच्या कार्यक्रमामध्ये असेही काही वर्गमित्र मिळाले त्यांना त्याचा खूप आनंदही झाला.
कार्यक्रम गेल्याच वर्षी करण्याचा मानस होता. परंतु काही कारणास्तव पोस्टपोन्ड होत होता तो योग काल जुळून आला. त्याचे श्रेय वर्गमित्र संतोष सुरसे, नारायण कवितके, कमलेश होनावळे आणि महेंद्र कसाबी यांना नक्कीच दिले पाहिजे. सातवीला आमचा 40 विद्यार्थ्यांचा पट होता आता त्यातील आमचा दिपक टकले, बाळासाहेब वाजे आणि गणेश लिंबोरे यांचा अकाली निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाकीचे काही कारणास्तव उपस्थित राहिले नाही त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पण उपस्थित राहिले असते तर नक्कीच स्मरणीय अनुभव मिळाला असता. या स्नेह मेळाव्यासाठी संतोष सुरसे, नारायण कवितके, कमलेश होनावळे, महेंद्र कसाबी, अनंत टकले, पिराजी भेगडे, संतोष घारे, स्वरूप चक्रनारायण, विशाल फुगे, मोहन डांगे, रमेश शिंदे, अजय वाघेला, विश्वास गालियत, विजय कुंभार, शिवाजी जव्हेरी, सचिन काळदंते, सागर जाधव, सोमनाथ खोंड, संजय मडके, योगेश जव्हेरी, दीपक दाभाडे आणि मी उपस्थित होतो.