सातत्याने पाठपुरावा केल्याने आज कामाला सुरुवात
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 येथील संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या क्रिस्टल हॉटेल, ट्राइज सोसायटी ते नॅचरल आइस्क्रीम कॉर्नर जोडला जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मा.विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महानगरपालिकेकडे या कामासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी स्थापत्य विभागाचे डेप्युटी सुनील शिंदे साहेब, क्लीम्सी कन्स्ट्रक्शनचे हबीब, सल्लागार प्रतिनिधी यांच्यासोबत या कामाची पाहणी केली. हा रस्ता १८ मीटर रुंद आणि ९२० मीटर लांबीच्या ‘डीपी’ रस्ता आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी १४ कोटी ८२ लाख ८९ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले असून दोन्ही बाजूंच्या समन्वयामधून हे काम शक्य झाले आहे.
या रस्त्यामुळे नाशिक फाटा ते जगताप डेअरी या बीआरटी मार्गालगतच्या स्वराज गार्डन, क्रिस्टल हॉटेल, योगा पार्क, आणि ट्राइज सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा रस्ता नाशिक फाट्याकडून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करणारा आहे. तसेच काटे वस्ती, गोविंद गार्डन आणि ट्राइज सोसायटीकडे वाहने सहज जाऊ शकतील त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांना लाभ होणार आहे. नाशिक फाटा, कोकणे चौक आणि गोविंद गार्डन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हिंजवडी आणि वाकडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक सोयीचा मार्ग ठरणार आहे.
प्रवासाच्या वेळेत बचत होणार असून रस्त्याचे काँक्रिटीकरण १० मीटर रुंदीचे राहणार आहे. वाहन चालकांना सुकर प्रवास अनुभवता येणार आहे. तसेच पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षेचा विचार करून हा रस्ता बनविला गेला आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २ मीटर रुंद पदपथ आणि एका बाजूस १.५ मीटर रुंद सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.