तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कलापिनी सांस्कृतिक केंद्र याचे विश्वस्त डॉ श्री अनंत परांजपे व विकेंड यूफनी चे प्रमुख श्री नितेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्वर संध्या हा मराठी गीतांचा कार्यक्रम रविवार १५ डिसेंबर २०२४ ला कलापिनी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार श्री विश्वास पाटणकर लाभले होते तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रजनी पाटणकर ,कलापिनीचे अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर, डॉ.अनंत परांजपे, डॉ.सौ अश्विनी परांजपे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. गेली ४८ वर्षे कलापिनी कै. पद्माकर प्रधान स्मृती सुगम संगीत स्पर्धा आयोजित करीत आहे. ह्या वर्षीच्या या स्पर्धांमधील गुणवंत कलाकारांना त्यांची गायन कला प्रस्तुत करण्याची संधी मिळावी म्हणून या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला असे नमूद करत विकेंड युफनी चे प्रमुख श्री नितेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विश्वास पाटणकर यांची ओळख सौ संपदाताई थिटे यांनी आपल्या गोड शैलीत करून दिली. दोन्ही संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
योगायोगाने त्याच दिवशी डॉ.अनंत परांजपे आणि डॉ.सौ अश्विनी परांजपे यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांना पुष्पगुच्छ आणि संगीताच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.
विनायक अभ्यंकर आणि डॉ.परांजपे ह्यांनी सर्वांशी संवाद साधला आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या. विश्वास पाटणकर यांनी त्यांचा मनोगतातून गायकांना आणि वादकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कलापिनीशी खूप जुनं नातं आहे असं म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘जमेल तेव्हा जमेल त्याने’ या समुहगीताने स्वरसंध्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर देव देव्हाऱ्यात नाही (तेजस जोशी), भरजरी ग पितांबर(गौरी मुळे), दिस चार झाले मन (निधी पारेख), अधीर मन झाले(श्रावणी कुलकर्णी) , मन उधाण वाऱ्याचे(अनिकेत जोशी) , केव्हा तरी पहाटे (अमृता झा) अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर झाली .
‘धुंद एकांत हा’ आणि ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ अश्या युगुल गीतांचा पण समावेश होता. कार्यक्रमाची सांगता आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे गीत ‘शतकांच्या यज्ञातून’ सादर करून सर्व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या संगीत संयोजन आणि मार्गदर्शना मध्ये सौ संपदाताई थिटे यांचा मोलाचा सहभाग होता. राजेश झिरपे(सिंथ) , प्रदीप जोशी (हार्मोनियम) , मंगेश राजहंस(तबला, ढोलकी), अनिरुद्ध जोशी(तबला), योगीराज राजहंस( साईड रिदम) या वादकांनी उत्तम साथ संगत केली. गायकांचा आणि वादकांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी श्री केदार अभ्यंकर यांनी नेहमी प्रमाणे उत्तम सांभाळली.
कलापिनी महिला मंचातील भगिनींनी कार्याधक्षा सौ अंजली सहस्रबुद्धे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनात खूप मदत केली. औपचारिक कार्यक्रमाचे निवेदन सौ रश्मी कुलकर्णी यांचे होते. गाण्याच्या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण, नेटके आणि उत्साहपूर्ण निवेदन सौ लीना परगी यांनी केले.
मोठ्या संख्येने उपस्थित राहून रसिकांनी कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली.