तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन दि.२६ डिसेंबर २०२४ ते दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
उद्घाटनाचे पुष्प दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी पद्मभूषण मा. सुमित्राताई महाजन, मा. सभापती, लोकसभा, भारत सरकार यांच्या भाषणाने गुंफले जाणार असून ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. भारताला लाभलेल्या समृदध ज्ञान परंपरा आज सगळया जगाला दिशादर्शक ठरतील अशा आहेत. या ज्ञान परंपरा, वारसा आजच्या पिढीने जतन करुन ठेवला पाहिजे. या पहिल्या पुष्पाचे अध्यक्षस्थान इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे भूषविणार आहेत.
दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. त्यांच्या या व्याख्यानामधून आई आणि बाप यांचे संवेदनशील नाते उलगडले जाणार आहे. या दुसऱ्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे उपस्थित राहणार आहेत.
दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी समारोपाचे पुष्प ज्येष्ठ संपादक संजय आवटे, दै. लोकमत, यांच्या व्याख्यानाने संपन्न होईल. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘चला उभारू नवी पिढी’ हा आहे. भारताची सुसंस्कृत, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान निर्माण करणारी नवी पिढी घडविण्यासाठी त्यांचे मौलिक विचार दिशादर्शक ठरणार आहे. या समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी दिलीप बंड (आय.ए.एस., माजी विभागीय आयुक्त) हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार मा. डॉ. अरुणा ढेरे (साहित्य), मा. बाळासाहेब काशीद (अध्यक्ष भंडारा डोंगर समिती), मा. पै . मारुती आडकर, मा. अलोक काळे (पर्यावरण) यांना देण्यात येणार आहे.
व्याख्यानमालेचे यंदाचे १० वे वर्ष असून या व्याख्यानमालेचा मावळ तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, पालक तसेच नागरिक, बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, सचिव चंद्रकांत शेटे आणि संस्था पदाधिकारी, व्यााख्यानमालेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व खजिनदार शैलेश शहा आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व संयोजक डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे.