तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रात नाट्यवाचन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. आगामी नाट्यवाचन स्पर्धांचे औचित्य साधून दर वर्षी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. मधुवंती हसबनीस आणि विनायक लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यवाचन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक बकरे, ज्येष्ठ सदस्या अनघा बुरसे आणि अन्य उपस्थित होते.
स्पर्धेत जर यश मिळवायचे तर कोणकोणत्या गोष्टीची तयारी केली पाहिजे याचे केवळ दोन तासाच्या कार्यशाळेत दोघांनीही उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मधुवंती हसबनीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, दिग्दर्शक हा फार महत्वाचा असून त्याची खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघात किती स्पर्धक आहेत, त्यांची वाचनाची किती क्षमता आहे, त्यांची भाषा, आवाज यानुसार संहितेची निवड करुन त्याचे किमान तीन वेळा तरी दिग्दर्शकाने वाचन केले पाहिजे. प्रत्येक भागातील भाषेचं टोनींग वेगवेगळं असतं जसं ग्रामीण आणि शहरी.मग त्यानुसार पात्रांची निवड करुन त्या त्या स्पर्धकांकडून तशी तयारी करुन घ्यायला हवी. नाटकातील भाग नाट्यवाचनासाठी निवडायचा असेल तर नाट्यमय घडामोडींचा भाग मध्यभागी ठेवून त्याची सुरवात आणि शेवट करायला हवा.
विनायक लिमये यांनी सांगितले, दुरचे,जवळचे संवाद कसे असतील? आवाजातले चढउतार, पॉजेसचा वापर कसा करायचा? हे प्रात्यक्षिक करुन दाखवलं. यासाठी रोज मोठ्याने पेपर वाचन महत्त्वाचे. म्युझिकचा वापर, मग तो आनंदी, गंभीर, विनोदी, दुःखी सर्वच प्रसंगानुरुप कसा करायचा? माईक आणि स्वतःमधले अंतर किती असावे? प,फ,ब,भ,म य या अक्षरांच्या वेळी तर माईकच्या फार जवळ गेले तर कसे ऐकू येईल? वाचन करताना हातवारे न करता चेहेऱ्यावर हावभाव कसे असले पाहिजेत? सर्वांकडून मुळाक्षरांचा सराव करुन घेतला.
या कार्यशाळेतून मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया सहभागी प्रशिक्षणार्थींकडून मिळाली. एकेका ग्रुपला संहिता देऊन प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून सराव करून घेतला. दिल्या होत्या. वाचनानंतर विनायक लिमये आणि मधुवंती हसबनीस यांनी मार्गदर्शन केले.
अशा रीतीने एक परिपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. डॉ विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिक मेहता, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे आदींनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.