तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रभर ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. लोणावळा येथील लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात मोठया उत्साहात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रम पार पडला. यांमध्ये प्रामुख्याने ग्रंथालय विभाग, मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
पहिल्या दिवशी वाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाचन करताना घ्यावयाची काळजी आणि वाचनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी ‘लेखक-वाचक संवाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये लोणावळा येथील लेखिका आणि संपादिका वसुधा पाटील यांनी ‘लेखक- वाचक संवाद’ या विषयावर मुलांशी संवाद साधला. तसेच भाषेचे आणि वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. मुलांमध्ये वाचनाची ओढ निर्माण व्हावी आणि मुलांना पुस्तकांचे महत्त्व समजावे यासाठी ग्रंथालय विभागात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख आणि लेखिका व संपादिका वसुधा पाटील यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रंथालय विभागाने अनेक विषयावरची दर्जेदार पुस्तकांची सुरेख मांडणी केली होती. नामवंत लेखकांची पुस्तके मुलांना वाचनासाठी ठेवण्यात आली होती. या ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुलांमध्ये वाचनाबरोबर लेखनाचीही सवय लागावी आणि आवडलेल्या पुस्तकावर मुलांनी लिहावे यासाठी ‘पुस्तक परीक्षण’ हा उपक्रम घेण्यात आला होता. यांमध्ये महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेऊन वाचलेल्या पुस्तकावरील पुस्तक परीक्षण केले. तसेच मुलांमध्ये कथाकथनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ‘कथाकथन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कनिष्ठ महावि्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग कथाकथन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी अनेक लोकप्रिय कथांचे ‘कथाकथन’ केले. या कथाकथनाला प्रेक्षक म्हणून मुलांचा आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, परीक्षा विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, ग्रंथालय समिती प्रमुख सुपर्णा मित्रा मॅडम, अनी वर्गीस मॅडम, ग्रंथालयाच्या चांगुणा ठाकर मॅडम, श्रीकांत होगले, प्रा. सोमनाथ आपटे, डॉ. संदिप लबडे, डॉ. धनराज पाटील, डॉ. अमर काटकर, डॉ. संदिप सोनटक्के, प्रा. संदिप खाडे, प्रा. संतोष शिंदे, प्रा. भूषण गोंदके, प्रा. भक्ती अहेर, प्रा. वैशाली कचरे यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.