
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
किल्ले विसापूर. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरी किल्ले विसापूर असहाय्य दुर्धर व जर्जर होऊन जीर्णोद्धाराची प्रतीक्षा पाहत आहे. होय, हाच तो विसापूर ज्याने शत्रू सैन्याचे प्रचंड वेदनादायी तोफगोळे हसत हसत झेलले आणि माझ्या राजाचे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी शत्रूच्या तोफखान्याला सामोरा गेला. गेली ३५० वर्षे ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता विसापूर खंभीर उभा आहे. कारण, शिवप्रेमी व दुर्गप्रेमी कार्यकर्त्यांमुळे त्याला जणू आशेचा किरण दिसतो आहे.
मावळ घाटमाथ्यावरील सतर्क पहारेदार म्हणून विसापूर किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी केलेल्या अनेक लढायांचा साक्षीदार आहे. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली प्रचंड तोफगोळ्यांचा मारा विसापूर किल्ल्याला सहन करावा लागला. त्यामुळे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वैभवशाली प्रवेशद्वारे छिन्न विच्छिन्न करण्यात आली. तेथपासून ते आजतागायत विसापूर किल्ला उद्धारकर्त्याच्या शोधात आहे.
पुणे जिल्ह्यातील मळवली रेल्वे स्थानकापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. प्रचंड मोठा विस्तार आणि सभोवताली दाट झाडी यामुळे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरला आहे. आज किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर गुहा, पाण्याच्या टाक्या, इतरत्र पडलेल्या तोफा, पडझड झालेली तटबंदी आणि राजवाडे इत्यादी वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या नैसर्गिक हानी मध्ये येथील शंभू महादेवाचे मंदिर सुद्धा सुटले नाही. २०१७ साली ते पूर्णपणे ढासळले आणि विसापूर किल्ल्याने अंतर्मनाने आर्त टाहो फोडला. त्यावेळेस श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाने ही बाब त्वरित पुरातत्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. मंचाच्या पाठपुराव्याला यश आले आणि भारतीय पुरातत्व विभागाने त्यांची मागणी मान्य करून शिव मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. शंभू महादेवाच्या मंदिरात दर सोमवारी मंचाचे कार्यकर्ते अभिषेक करतात त्यामध्ये प्रामुख्याने सागर कुंभार ,अनिकेत आंबेकर, अजय मयेकर , सचिन निंबाळकर ,चेतन जोशी यांचा समावेश असतो . त्यामुळे गडावर ऊर्जा निर्माण होऊन गडावरील वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे विसापूर किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे.
लोहगड आणि विसापूर किल्ला म्हणजे दोन डोळ्यांप्रमाणे अगदी जवळ असणारे दुर्ग बंधूच. गेल्या पंचवीस वर्षात लोहगडाचे पालटणारे रूप पाहून शिवप्रेमींना आनंद होतो. मंच आणि लोहगड घेरेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने लोहगडावर असणाऱ्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार करून येथील कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला होता. आणि बघता बघता भारतीय पुरातत्व विभागाने देखील पायऱ्यांची व तटबंदीची डागडूजी केली. लोहगडाला दरवाजे बसले आणि समाजकंटकांचा बंदोबस्त झाला. पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. त्यामुळे गेल्या काही वर्षात तरुणाई व पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होऊ लागले. आता किल्ले विसापूरला प्रतीक्षा आहे अशाच गतवैभवाकडे परतण्याची. विसापूर किल्ल्यावरील महत्त्वाचे स्थान म्हणजे या ठिकाणी एकेकाळी असणारा तीन मजली भव्य राजवाडा. वेलींनी आणि काटेरी झुडपांनी या राजवाड्याचा श्वास गुदमरला होता. वेळोवेळी मंचाच्या कार्यकर्त्यांनी येथील साफसफाई केली आणि राजवाड्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. परंतु, प्रतीक्षा आहे ती या राजवाड्याच्या संवर्धनाची, जेणेकरून याची यापुढे होणारी हानी टाळता येईल. मंचाचे कार्यकर्ते भारतीय पुरातत्त्व विभागाकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करतात. लवकरच दुर्गसंवर्धनाचा आरंभ विसापूर वरील हा भव्य दिव्य राजवाडा तसेच, गडावर जाणाऱ्या पायऱ्यांपासून होईल असा विश्वास लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, अमोल गोरे यांनी व्यक्त केले.
About The Author

