तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पुणे काईट्स या संस्थेचे सदस्य व काईट फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेत फाऊंडर मेंबरशिप मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रेस फोटोग्राफर श्रीकांत नारायण चेपे व रमेश पार्टे यांना नुकताच केरळ मधील कोची (कोचीन) येथील समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या आंतरराष्ट्रीय काईट्स (पतंगबाजी) महोत्सवात सुवर्णपदक मिळाली आहे.
या आंतरराष्ट्रीय काईट्स (पतंग) महोत्सवात जगभरातून जवळपास ७० खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. काईट्स (पतंग) हा हवेच्या विरोधात उडणारा आकाशातील मैदानी खेळ आहे. या पतंगात पंख, टिथर, अँकर, लगाम व शेपटी असते. वेगवेगळ्या आकाराचे व उंचीचे पतंग त्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात उडविण्यात आले.
श्रीकांत चेपे हे तळेगाव दाभाडे( स्टेशन) येथील यशवंत नगरमध्ये राहत असून ते प्रेस फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम पाहतात. पुणे मुंबई गोवा व परदेशात सुद्धा अनेक काईट्स स्पर्धेत ते सहभागी होत असतात. नुकताच श्रीकांत चेपे व रमेश पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे वडगाव कामशेत येथे भव्य पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे तळेगाव दाभाडे शहरात व तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.