
वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांची

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर यांना एचएसआरपी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील जनतेकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे ती थांबवली पाहिजे तसेच नंबर प्लेटसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड वाहतूक सेल शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी दिली आहे.
विनोद वरखडे यांनी म्हटले आहे की, वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे. कारण एचएसआरपी नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि. (Rosmerta Safety systems LTD), रीअर मेझॉन इंडिया लि. (Real Mazon India LtD) आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. (FTA HSRP solutions Pvt. LtD.) या खासगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत.
गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकीसाठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात ८७९ अशी बरीच तफावत दिसत आहे. ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे. या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट दिले याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच यापुर्वी ज्या वाहनधारकांनी ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन सदरची एचएसआरपी नंबर प्लेट बसून घेतली आहे त्यांना जे दर नियमित होतील त्यातून जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहर कार्याध्यक्ष अकबरभाई शेख, शहर उपाध्यक्ष स्वप्निलभाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.