


पुणे : प्रतिनिधी
टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्याने रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. रिक्षा चालकांचा व्यवसाय वाचविण्यासाठी एकजुटीतून टू व्हीलर टॅक्सीला विरोध करू, महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टाकीला दिलेली परवानगी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पुण्यातील रिक्षा चालकांना केले. या साठी पुणे शहरात जनजागृती करून सर्व रिक्षा चालक-मालक व रिक्षा संघटनांना एक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले.
“टू व्हीलर टॅक्सीला विरोध करण्यासाठी तसेच, मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा, ईरिक्षाला परमिटची सक्ती करण्यात यावी, कल्याणकारी महामंडळाचे अंमलबजावणी करण्यात यावी, यासह रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्त्वात संघटनेने जनजागृती जनसंवाद अभियान सुरू केले आहे. सोमवारी (दि. 21) दुपारी तीन वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. या वेळी उपस्थित रिक्षा चालकांना बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील उपाध्यक्ष,प्रवीण शिखरे, विल्सन मस्के, पुणे शहर संघटक निशान भोंडवे, फ्रान्सिस जॉन अँथोनी, पुणे स्टेशन अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष, गणेश कांबळे, महादेव गायकवाड, मल्लेश कांबळे, रमेश इंगळे, फिरोज सोनागो, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जनजागृती, जनसंवाद अभियानाला सुरुवात करण्यात आली. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले आहे त्याची अंमलबजावणी करणे,ओला उबेर या भांडवलदार कंपनीकडून रिक्षा चालकांचे होणारे शोषण थांबवणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करून, ई रिक्षा ला परमिट च्या कशात आणणे, यासह रिक्षा चालकांच्या इतर विविध प्रश्नांचा अभ्यास रिक्षा चालकांशी चर्चा करून बाबा कांबळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन त्यानंतर पुढील टप्प्यात प्रवाशांशी देखील संवाद साधून निर्णय भूमिका घेणार असल्याचे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.
बाबा कांबळे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या या आंदोलनाचा आदर्श घेऊन अहिंसेच्या व लोकशाही मार्गाने रिक्षा वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे. टू व्हीलर वरून प्रवाशी वाहतूक केली जाणार आहे. यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणी मध्ये येण्याची शक्यता आहे. तीन रुपये किलोमीटरने टू-व्हीलर टॅक्सी धावणार असल्याचे सांगितले जात आहे. मग रिक्षात कोण बसणार असा प्रश्न आहे. टू व्हीलर टॅक्सीमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत येणार आहे. आपला रिक्षा व्यवसाय वाचविण्यासाठी पुणे शहरातील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये मोठे आंदोलन उभारणे आवश्यक आहे, असे बाबा कांबळे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले.