


पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त आश्वासन नाही, तर कृतीशील योजना घेऊन मैदानात उतरलेला पक्ष आहे. लवकरच जिल्हास्तरावर उद्योग मार्गदर्शन शिबिरे, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. “रोजगार हा हक्काचा अधिकार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेल प्रदेशाध्यक्षा मेघा पवार यांनी केले.
रोजगार व स्वयंरोजगार सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 22 एप्रिल रोजी जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग कार्यालयास सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेशाध्यक्ष मेघा पवार यांनी केले. भेटीचा मुख्य उद्देश तरुणांना शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती देणे, तसेच त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेशाध्यक्ष मेघा पवार यांनी दिली.
या भेटीदरम्यान प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), विश्वकर्मा, खादी ग्रामोद्योग योजना याबाबत अधिकाऱ्यांशी सखोल संवाद साधण्यात आला. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी युवकांना येणाऱ्या अडचणी, बॅंकांचा मनमानी कारभार, प्रक्रिया सुलभीकरण आणि तांत्रिक मदतीबाबत सुचना दिल्या.
यावेळी रोजगार व स्वयंरोजगार सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश मंगाणे, महाराष्ट्र सचिव संजय खंडारे, पुणे शहर अध्यक्ष अजित मुत्तीन यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.