
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी संबंधित घरमालकांना बजावल्या नोटिसा
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
शहर हद्दीत १६२ इमारती या धोकादायक असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणी मधून समोर आले असून, शुक्रवार दिनांक १९जून २०२५ रोजी अशा सर्व इमारतीवर धोक्याची सूचना दर्शवणारे फलक नगरपालिका प्रशासनाने लावले असून, संबंधित घरमालकांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नोटीसा बजावल्या आहेत. नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये ७०ते १०० वर्ष जुन्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. मुळ गावठाणात तसेच विविध भागांमध्ये असलेल्या बैठ्या निवासी घरांमध्ये अजूनही नागरिक राहत आहे. १६२ घरे आणि इमारती ची दुरावस्था झाली असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या इमारती व घरांच्या भिंती कमकुवत होणे. मोडकळीस येणे, पाया खचने, छतांचा आधार कमकुवत होऊन ते तिरके होणे आदी प्रकारामुळे त्या केव्हाही पडण्याचा धोका असल्याचे पाहणीत आढळून आले असून महाराष्ट्र नगरपरिषद. नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ११५ नुसार वापरात असलेली मिळकत काढून टाकण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या मिळकत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका होऊन वित्तहानी होऊ शकते, असा दावा नोटीस मध्ये केला आहे. त्यामुळे या इमारत बांधकाम मोकळे करून त्वरित उतरवून घ्यावे.
या इमारत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच या ठिकाणी काही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालकांची असेल, असा स्पष्ट उल्लेख बजावण्यात आलेल्या नोटीसांमध्ये करण्यात आला आहे
About The Author
