
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
मावळ तालुक्यात भात लावणीला सुरुवात झाली असून यावर्षी देखील पारंपारिक आणि सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांनी पसंती दिली असून हिरव्या भात रोपांनी शेताचे सौंदर्य खुलले असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर भात रोपे तयार केली आणि खाचरात लावण्यासाठी पुरेसे पाणी असल्याने लावणीला उत्साहाने सुरुवात केली. काही शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने भात लागवड करत आहेत तर काही शेतकरी आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे. मावळ तालुक्यात प्रामुख्याने इंद्रायणी भात वाणाला अधिक पसंती दिली जात आहे.
मावळ तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने मावळची ओळख भाताचे आगार म्हणून सर्वत्र आहे. सुमारे १३ हजार हेक्टर पर्यंत भात पिकाची लागवड मावळात होते. गेल्या आठवड्यात मावळ तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये चांगला पाऊस पडल्याने भात पिकाला याचा चांगलाच फायदा होऊन भात रोपांची वाढ ही चांगली झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने भात लावणीला सुरुवात केली असून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्याने रोपे कमी लागत असून, भात लावणीस कमी वेळ लागतो तसेच बियाणे कमी लागल्याने खर्च देखील कमी होतो, असे अनेक शेतकरी बांधवांनी सांगितले.
About The Author

