
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पर्यावरणाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला पाहिजे व पर्यावरण विषयक योजनांची अंमलबजावणी नागरिकांपर्यंत झाली पाहिजे, असे आवाहन तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अंतर्गत प्लास्टीक मुक्त तळेगाव जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य अधिकारी ममता राठोड, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, सहप्रांतपाल दीपक फल्ले, रो. किरण ओसवाल, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्ष्ाल पंडित आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी सर्वांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली.नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी व सर्व नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात प्लास्टिक मुक्तीबाबत घोषवाक्य असलेले फलक होते. स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, प्लास्टिक हटाव, तळेगाव बचाव या घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी 7 पथनाटय सादर केली. टेक्नोवेस कंपनीच्या वतीने सहभागी सर्व विद्यार्थ्यांना निखिल महापात्रा यांनी प्रशस्तीपत्रक दिले.
प्लास्टीकला पर्यायी प्लास्टिकचा वापर करावा आणि कापडी पिशव्याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावे, असे आवाहन गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना दुध व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता खोल्लम यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले व सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन निखिल महापात्रा, बसप्पा भंडारी, प्रदीप मुंगसे, दिनेश चिखले, मेधा शिंदे, दीक्षा वाईकर, ललित देसले, अभिषेक पांडे, शुभम महाजन, डॉ. धनश्री काळे यांनी केले.
About The Author

