
तळेगाव दाभाडे : प्रतिनधी
चाकण-तळेगाव एम.आय.डी.सी परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यात यावे, यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभय भोर व उद्योजकांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये अभय भोर यांनी नमूद केले की, पिंपरी चिंचवड सह चाकण, तळेगाव, भोसरी, रांजणगाव, शिक्रापूर,राजगुरुनगर, कोरेगाव भीमा, सणसवाडी, आळंदी परिसरात बहुराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह लघु व मध्यम उद्योजक कार्यरत आहेत. त्यांना मालवाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्यासाठी वेळेवर माल पोहोचविणे, निर्यातीस चालना देणे, आणि लॉजिस्टिक खर्च कमी करणे महत्त्वाचे आहे. या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या कामाला गती मिळू लागल्यामुळे चाकण येथे कार्गो विमानतळ उभारण्याची गरज आहे. दळणवळणाची आधुनिक सुविधा निर्माण होऊन औद्योगिक वाढीला चालना मिळेल अशी मागणी ही करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून हवाई दळणवळण विषयक प्रश्नांची सोडवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, वैभव जगताप, दुर्गा भोर, जयश्री साळुंखे, हर्षवर्धन लोखंडे, राजीव केंद्रे आदी निवेदन देताना उपस्थित होते
About The Author

