Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव : “मोठेपणा आलं तरी जमिनीवर पाय ठेवून राहावं, समाजाच्या भल्यासाठी अखेरपर्यंत काम करत राहावं, हे कै. कृष्णराव भेगडे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मावळातील आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती अशा विविध क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आजही मार्गदर्शक ठरतं,” अशा भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केल्या.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा सभागृहात आयोजित कै. कृष्णराव भेगडे यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. काकडे म्हणाले, “तळेगाव पॅटर्न संकल्पना देशभर पोहोचवण्याचं श्रेय भेगडे साहेबांचं आहे. त्यांनी तळेगावचं नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे कोरलं. विधानमंडळातील त्यांची भाषणं नवोदित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शक ठरतात.”

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले, “तळेगावची संस्कृती आणि शिस्त जपण्यासाठी भेगडे साहेबांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्या पराभवानंतर तळेगावात एकही चूल पेटली नव्हती, एवढा जिव्हाळा जनतेच्या मनात त्यांच्या विषयी होता,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चंद्रकांत शेटे, रूपा कानिटकर, संदीप काकडे, युवराज काकडे, संजय साने, डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, डॉ. साहेबराव पाटील, सुलोचना इंगळे, रवींद्र शेळके, प्रा. उत्तम खाडक, प्रा. संदीप भोसले, डॉ. संभाजी मलघे, डॉ. साहेबराव पाटील, सुरेश चौधरी, विलास भेगडे, गडसिंग साहेब, निरुपा कानिटकर, संदीप काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करून कै. भेगडे यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. आर. आर. डोके आणि विजय खेडकर यांनी केलं.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *