
तळेगाव पोलिसांची तत्पर कारवाई
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत घोरावडेश्वर पायथ्याजवळील परिसरातून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन काडतुसे असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शरीर व मालमत्तेच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये शस्त्र वापराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना आणि गुन्हे शाखांना विशेष दक्षतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकांनी संभाव्य गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
याच पार्श्वभूमीवर, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, घोरावडेश्वर पायथ्याजवळ दोन तरुण पिस्तुल घेऊन थांबले आहेत. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटक आरोपी प्रशांत शांताराम आंबेकर ऊर्फ पहलवान (वय २६, रा. देवळे, ता. मावळ, जि. पुणे) ओंकार बाळू भारती (वय २२, रा. भवानीनगर, कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे) तपासात दोघांकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या मिळून आली. त्यांच्यावर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) बाळासाहेब कोपनर, सहाय्यक पोलिस आयुक्त (देहूरोड विभाग) बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात (तळेगाव दाभाडे), पोलिस निरीक्षक प्रविण कांबळे (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत मुकेश मोहारे, संतोष जाधव, प्रशांत निंबळे, अजय सरजिने,आनंद मोहिते, सुधाकर केंद्रे, प्रकाश जाधव आणि किरण लोखंडे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
About The Author

