Spread the love

समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश 

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

महापालिकेच्या हद्दी लगत असलेली आयटी पार्क हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत घ्यावीत. त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होईल, असे साकडे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. त्यावर समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.

खासदार बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थानिक नागरिक, आयटीएन्स यांच्यासोबत भेट घेतली. आयटी पार्कची जलकोंडी, वाहतूक कोंडी याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी शिंदे यांना दिली. याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी, मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत. या भागात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असून वळविले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडी जलमय झाली.

नदीलाही गटारीचे स्वरूप आले आहे. या गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. बांधकामावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे या परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूक कोंडी, विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत. हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागत आयटी पार्क आहे. देशभरातील नागरीक येथे येतात. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे. गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे यां गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा. या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *