Spread the love

मुंबई : प्रतिनिधी

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष वेधून ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वाहतूक, मेट्रो, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आले.

यासंबंधी स्पष्ट भूमिका घेत, सूर्य हॉस्पिटलपासून वाकडमार्गे हिंजवडी फेज ३ पर्यंत PMRDA हद्दीतून ३० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आरक्षित करून विकसित करण्याची स्पष्ट मागणी केली होती. या रस्त्यामुळे सध्याच्या मुख्य मार्गावरील ५० टक्क्यांहून अधिक वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, PMRDA व पिंपरी-चिंचवड महापालिकेला रस्ता आरक्षित करून लवकरात लवकर विकसित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी फेज एक, शनि मंदिर वाकड ते मारुंजी, नांदे ते माण या रस्त्यांची रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. तसेच पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिन्याभरात कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

त्याचबरोबर, निगडी मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा DPR मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली होती. यावरही मा. देवेंद्रजींनी यांनी सकारात्मक भूमिका घेत, हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचे आदेश दिले.

हिंजवडीतील विविध शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे विकासकामे रखडत असल्याचे अधोरेखित करत, एकवटलेल्या नियंत्रण यंत्रणेची गरज अधोरेखित केली. यावर देवेंद्र फडणवीस ‘सिंगल पॉइंट ॲथॉरिटी’ स्थापन करून सर्व विकासकामे एकाच छताखाली आणण्याची घोषणा केली.

हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी मजबूत रस्ते, सक्षम सार्वजनिक वाहतूक आणि नियोजनबद्ध विकास अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्तरावर हा मुद्दा सातत्याने मांडल्यामुळेच ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि निर्णायक टप्प्याकडे वाटचाल झाली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह IT फोरमचे श्री. सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे श्री. संजीवन सांगळे, बाणेर-बालेवाडी रेसिडेंट असोसिएशन, #UnclogHinjawadiITPark मोहिमेतील प्रतिनिधी, हिंजवडी एम्प्लॉईज अ‍ॅण्ड रेसिडेंट्स ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्यासह IT फोरम व सोसायटी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश

◼️ सर्व समन्वयासाठी सिंगल पॉइंट ॲथॉरिटीची स्थापना.

◼️ ३० मीटर पर्यायी रस्ता विकसित करणे

◼️ डिसेंबर २०२५ पर्यंत हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू करणे.

◼️ लक्ष्मी चौक पूल सहापदरी करणे

◼️ पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणासाठी तांत्रिक उपाययोजना.

◼️ पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक अंडरपासची कामे सुरू करणे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *