
प्रभू श्रीरामांच्या जयघोषात उसळला उत्साह!
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
विजयादशमीच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्साहाने आकुर्डी परिसर दुमदुमला! शिवसेना माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ३५ फुटी भव्य रावणाचे दहन करण्यात आले. प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या अश्वरथासह ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेने परिसरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
मिरवणुकीत “जय श्रीराम”च्या घोषणांनी आकाश दणाणले होते. नागरिकांनी घराबाहेर येऊन प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांना अभिवादन केले. सीता हरण व रावण वधाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला, ज्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी पेटवलेल्या ३५ फुटी रावणाच्या पुतळ्याने आकाश प्रकाशमय झाले, आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.
या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक मिलिंद देशपांडे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, उद्योजक रवींद्र नामदे, विठ्ठल साखरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर, सागर धुमाळ आदी मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मिलिंद देशपांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने संघातर्फे पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि ‘स्व’बोध या पाच मुद्द्यांवर समाजजागृतीचे अभियान राबवले जात आहे. प्रत्येक स्वयंसेवक समाजहितासाठी कार्यरत आहे.”
“आकुर्डी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशस्त रुग्णालय उभारून नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून दिले आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाळखी तळ, कमान आदी सुविधा उभारल्या आहेत. पोलिसांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले असून, पुढील काळात आकुर्डीला एक आदर्श विभाग बनवण्याचा निर्धार आहे.”
– प्रमोद कुटे, माजी नगरसेवक
About The Author
