Spread the love

चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचा भव्य सोहळा; “मनातील रावण जाळा” असा सामाजिक संदेश

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

दसऱ्याच्या मंगलदिनी पिंपळे सौदागर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषात दुमदुमला!

शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य ७० फुटी ‘रावण दहन’ सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (२ ऑक्टोबर) प्रचंड उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ उत्सव नव्हता, तर सामाजिक जागृतीचा उत्सव होता. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या चिरंतन संदेशासोबत समाजातील अहंकार, द्वेष, मत्सर आणि व्यसनाधीनता यांसारख्या रावणीय प्रवृत्ती नष्ट करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

गोविंद यशदा चौक, बीआरटी रोड, नेक्सा शोरूम समोर पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा जनसागर उसळला.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या संकल्पनेतून आणि टीमच्या अथक प्रयत्नातून हा “महाराष्ट्रातील सर्वात मोठा रावण दहन कार्यक्रम” यशस्वीरित्या साकार झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनी जगताप, तसेच पवना सहकारी बँकेचे चेअरमन श्री. जयनाथशेठ काटे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष तेज लाभले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर, तसेच पिंपळे सौदागर व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार सांस्कृतिक मनोरंजनाच्या सादरीकरणांनी झाली.

कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओ ग्रुपने दिलखेचक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना थिरकवले, तर सुनील अनिल तिलकधारी (हिसार, हरियाणा) यांनी साकारलेले हनुमान पात्र आणि महाकालवरील नृत्य अविस्मरणीय ठरले.

कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांचा सहभाग हा उपस्थितांसाठी पर्वणी ठरला. यामध्ये गायक अवधूत गांधी, मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, ‘मना’ चित्रपट फेम मृण्मयी देशपांडे, तसेच ‘तारिणी’ मालिकेतील अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी आपल्या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

“केवळ पुतळ्याचा रावण नव्हे, तर आपल्या मनातील ‘आतला रावण’ जाळणे ही खरी विजयादशमी आहे. अहंकार, द्वेष, मत्सर आणि सामाजिक विषमता या प्रवृत्तींचा त्याग करून समाजात बंधुभाव आणि विधायकतेचा विजय व्हावा.”

कार्यक्रमाच्या शेवटी ‘रावण दहन’चा क्षण येताच परिसरात “जय श्रीराम!” चा गजर घुमला. ७० फुटी भव्य रावणाच्या पुतळ्याचे दहन होताच आकाशात फटाक्यांची आतषबाजी झळकली आणि उपस्थितांनी जल्लोष साजरा केला.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांनी उपस्थित मान्यवर, नागरिक, पोलीस व वाहतूक विभाग, अग्निशामक दल आणि महापालिका अधिकारी यांचे आभार मानले.

शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या कष्टांमुळे हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील अविस्मरणीय सोहळा ठरला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय मोरे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *