Spread the love

प्रभागरचनेतील अन्यायाविरोधात ॲड. सचिन भोसले यांची हायकोर्टात धाव

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. राजकीय सुडबुद्धीपोटी आणि विशिष्ट स्वार्थ साधण्यासाठी प्रभाग क्रमांक २४ मध्ये जाणीवपूर्वक बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेत डांगे चौक, गणेशनगर, थेरगाव या भागांसह म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २४ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र या झोपडपट्टीचा भाग वाकडच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये हलवून, मतदारसंख्येचा आणि आरक्षणाचा समतोल बिघडविण्यात आला आहे. “हा बदल राजकीय हेतूनेच केला गेला असून, अनुसूचित जातींच्या प्रतिनिधित्वावर घाला घालणारा आहे,” असा आरोप ॲड. भोसले यांनी केला.

भोसले यांनी या प्रकरणी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली असून, प्रभाग क्रमांक २४ मधील आकडेवारीसह संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. याचिकेद्वारे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागाचा मूळ हेतू अबाधित राहावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“संविधानाने मला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. कितीही कटकारस्थान झाले तरी मी मागे हटणार नाही. २०१७ मध्ये जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. आजही तोच विश्वास कायम आहे आणि मी पुन्हा जनतेच्याच आशीर्वादाने विजय मिळवणार,” असे भोसले यांनी ठामपणे सांगितले.

स्थानिक नागरिकांमध्येही या प्रभागरचनेविषयी तीव्र असंतोष दिसून येत असून, “प्रभागरचना ही जनतेसाठी नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली,” अशी टीका शहरात सुरू आहे.

ॲड. भोसले यांनी दाखल केलेली ही याचिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकीय समीकरणात मोठी हलचल निर्माण करणारी ठरली आहे.

 

“प्रभागरचनेतील पारदर्शकता पूर्णपणे गायब आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट पक्षांना फायदा होईल, अशा पद्धतीने सीमारेषा आखल्या गेल्या. हा सरळ सरळ अन्याय असून, मी न्यायासाठीच लढतोय,”

— ॲड. सचिन भोसले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *