Spread the love

पालघर : प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या कुमारी हेमांगी चंदू पागी हिला अचानक रक्ताची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याने विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मदतीसाठी आर्त आवाहन करण्यात आले. “कोणी रक्तदाता आहे का?” या संदेशांनी सोशल मीडियावर धाव घेतली; मात्र वेळ निघून जात असताना योग्य रक्तगट मिळत नव्हता.

अशा जीवघेण्या प्रसंगी पिंपळशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. मितेश पागी यांनी कोणताही गाजावाजा न करता तात्काळ पुढाकार घेतला. स्वतः रक्तदान करून त्यांनी हेमांगीचा जीव वाचवला. त्यांच्या या तातडीच्या आणि निःस्वार्थ कृतीमुळे एक निरपराध जीव सुरक्षित राहिला.

या घटनेत युवा आदिवासी संघाचे कार्यकर्तेही सतत प्रयत्नशील होते. माजी कार्याध्यक्ष विणू दादा मौळे आणि राहुल घेगड यांनी संघाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नांना डॉ. पागी यांची साथ मिळाल्याने परिस्थितीवर वेळीच मात करता आली.

डॉ. पागी यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष कु. संदीप माळी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून हेमांगीला निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या.

ही घटना केवळ एका जीव वाचवण्याची नाही, तर समाजात मानवतेचा जिवंत संदेश देणारी ठरली आहे. संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे केला, तर प्रत्येकजण कुणाच्या तरी आयुष्यात ‘देवदूत’ ठरू शकतो, हेच या घटनेतून अधोरेखित झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *