Spread the love

टाळ-मृदुंगाच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा; फुलांची उधळण, रोषणाई आणि भक्तिभावाने नटलेले वातावरण

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

चैत्र गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर तळेगाव दाभाडे येथे श्रींच्या छबिना पालखीची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. सायंकाळी ६.३० वाजता मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले आणि संपूर्ण गाव धार्मिक वातावरणात न्हाऊन निघाले.

या सोहळ्याची सुरुवात श्रीमंत सरदार श्री सतेंद्रराजे दाभाडे, श्री सत्यशीलराजे दाभाडे (सरकार) तसेच उत्सव समिती अध्यक्ष श्री अक्षय अशोक पाटोळे यांच्या हस्ते श्रींची आरती करून झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणुकीत नगारा, ढोल-ताशे, टाळ-मृदुंग, भजनी मंडळ यांचा निनाद घुमत होता. महिला वर्ग, गोंधळी, भराडी, गुरव (पुजारी) व पुरोहित रेडे परिवार यांच्यासह विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. तसेच पालखीचे भोई समाज बांधव, श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, उत्सव समिती, डोळसनाथ तालीम मंडळ आणि पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत मिरवणुकीला रंगत आणली.

विद्युत रोषणाईने सजवलेली छत्री, आकर्षक बॅंड, घोडे-ऊंट यांची उपस्थिती आणि संभाळ यामुळे मिरवणूक अधिक देखणी झाली. संपूर्ण गावातून पालखीची ग्रामप्रदक्षिणा पार पडली आणि रात्री ११.२० वाजता पुन्हा मंदिरात आगमन झाले.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट, भव्य मंडप आणि सुंदर रोषणाई करण्यात आली होती. उत्सव समितीने उत्तम नियोजन करून भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

ग्रामस्थांनीही या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. प्रदक्षिणा मार्गावर अनेक ठिकाणी फुलांची उधळण करत श्रींचे स्वागत करण्यात आले. थंड पाण्याची व्यवस्था करून भाविकांची सेवा करण्यात आली. तसेच पालखी खांदकऱ्यांचे पाय धुऊन औक्षण करून दर्शन घेण्याची पारंपरिक पद्धतही मोठ्या श्रद्धेने पार पडली.

या भव्य मिरवणुकीमुळे तळेगाव दाभाडे परिसर भक्तिरसात रंगून गेला. गुढीपाडव्याच्या या मंगलमय सोहळ्याने ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *