Spread the love

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा उपक्रम; विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग, ५ वी पास ते पदव्युत्तर उमेदवारांना संधी

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने २८ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत भव्य ‘नोकरी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा महोत्सव मोठी सुवर्णसंधी ठरणार असून, परिसरातील बेरोजगार युवकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा नोकरी महोत्सव इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालय व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी या महोत्सवाचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष संजय साने, कार्यवाह चंद्रकांत शेटे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, डीएमसीएफएमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय झोपे, पोलिस उपआयुक्त श्वेता खेडकर, तहसीलदार वैशाली वाघमारे यांचा समावेश आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील आरएमके स्पेसेसचे संचालक रणजीत काकडे, डीएससी इंटिग्रेटेड लॉजिस्टिकचे संचालक विशाल लोखंडे आणि डीएमसीएफएस स्किल फाउंडेशनचे संचालक महेश निंबाळकर हेही उपस्थित राहणार आहेत.

या नोकरी महोत्सवात तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, कान्हे आणि उसे या औद्योगिक पट्ट्यातील विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या महोत्सवात ५ वी ते १० वी उत्तीर्ण, आयटीआय पदविका धारक, अभियांत्रिकी पदवीधर (बीई/बीटेक) तसेच विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेच्या विविध स्तरांवरील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १४,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार असून, त्यासोबतच वसतिगृह व भोजन सुविधा, प्रशिक्षणार्थी संधी, कंपनीच्या कायम सेवेत समावेश तसेच ‘शिका व कमवा’ यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या नोकरी महोत्सवासाठी वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे निश्चित करण्यात आली असून, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.

आरएमके स्पेसेस, डीएससी इंटिग्रेटेड लॉजिस्टिक, श्यामल एंटरप्रायझेस (मनुष्यबळ सेवा) आणि डीएमसीएफएस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या नोकरी महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी ८४८४९५५३७०, ७३७८७५६९३७, ९१६८०१९९९१, ८८५५०४६२२६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *