Spread the love

४० कंपन्यांचा सहभाग; स्वयंरोजगारालाही प्रोत्साहन — खासदार श्रीरंग बारणे यांचा संदेश

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘नोकरी महोत्सवा’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या महोत्सवामध्ये तब्बल ४० कंपन्यांनी सहभाग घेतला असून ९२० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी ८०६ तरुणांना थेट ऑफर लेटर देण्यात आले, तर ८ दिव्यांग उमेदवारांचाही समावेश असल्याने हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.

या महोत्सवाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे, डॉ. संजय झोपे, उद्योजक संजय साने, रंजीत काकडे, विशाल लोखंडे, विशाल निंबाळकर, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुणे परिसरात उद्योगांचे जाळे विस्तारत असल्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मात्र, तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडेही वळावे. बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, रेल्वे विस्तारीकरणामुळे कनेक्टिव्हिटी वाढत असून रोजगार आणि व्यवसायाच्या संधी अधिक विस्तारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना योग्य करिअर दिशा मिळत असल्याचे सांगितले. मावळ तालुक्यात कोरियन, जपानी, जर्मन अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती उपस्थिती लक्षात घेता विविध भाषांचे ज्ञान आवश्यक ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासासोबतच भाषा शिक्षणावर भर द्यावा, असे त्यांनी सुचविले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी उद्योग आणि शिक्षण यांच्यातील समन्वयाची गरज अधोरेखित केली. कंपन्यांच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक असून कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कंपन्यांनी CSR अंतर्गत शैक्षणिक संस्थांना मदत करावी आणि जुन्या मशिन्स उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उमेदवारांची नोंदणी वाढल्याचे सांगितले. या उपक्रमातून अनेकांना रोजगाराची संधी मिळत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

डॉ. संजय झोपे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यांच्या आधारे उत्कृष्ट करिअर घडवता येते, असे सांगितले. स्वयंरोजगाराच्या क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत शेटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका रोकडे आणि राजाराम डोके यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल लोखंडे आणि महेश निंबाळकर यांनी मानले.

तळेगाव, चाकण, कान्हे फाटा, टाकवे आदी औद्योगिक भागांतील कंपन्यांच्या सहभागामुळे हा महोत्सव रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. एकूणच, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा हा उपक्रम तरुणांच्या भवितव्यासाठी दिशा देणारा ठरला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *