तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे नागरिकांना विविध शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः तरुण पिढीत वाढत्या ताणतणावामुळे मानसिक अस्थिरता आणि आरोग्यविषयक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि अध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी “प्रेमगंध विश्व” या संस्थेच्या वतीने एक दिवसीय ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, दि. २९ मार्च रोजी दुपारी ३.३० ते रात्री ८.०० या वेळेत तळेगाव दाभाडे येथील माळवाडी परिसरातील माऊली मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये ध्यान, मन:शांती तंत्र, सकारात्मक विचारसरणी आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कामाचा ताण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी ध्यान साधना ही प्रभावी उपाययोजना ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामागे समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्तीला सक्षम बनविण्याचा उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
About The Author

