६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक विधी, पालखी सोहळा, गायक-नृत्य कलाकारांचे सादरीकरण; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री हनुमान उत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असलेला हा उत्सव ६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवाची सुरुवात सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी पारंपरिक पूजाअर्चा व अभिषेकाने होणार आहे. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी भव्य पालखी सोहळा आणि ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन हनुमंताच्या जयघोषात वातावरण भक्तिमय करतात.
मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी उत्सवाला सांस्कृतिक रंग चढणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नृत्य कलाकार राधा पाटील (मुंबईकर) यांच्या लाईव्ह गायनाचा कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या सुमधुर आवाजात सादर होणाऱ्या गाण्यांमुळे उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव मिळणार आहे.
यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणारी भव्य ढोल-ताशा झांज पथक स्पर्धा विशेष उत्सुकतेचा विषय ठरली आहे. या स्पर्धेत विविध भागांतील पथके सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात रंगणाऱ्या या स्पर्धेमुळे परिसर दणाणून जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये व मानाचा चषक, द्वितीय ४१ हजार, तृतीय ३१ हजार, चतुर्थ २१ हजार आणि पाचवे पारितोषिक १५,५५५ रुपये असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता आणि स्पर्धात्मकता पाहायला मिळत आहे.
यासोबतच “महाराष्ट्राची लाडकी” म्हणून ओळखली जाणारी नृत्य कलाकार राधा पाटील (मुंबईकर) यांचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्सही उत्सवात रंग भरणार आहे. त्यांच्या सादरीकरणामुळे युवक-युवतींसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्री हनुमान उत्सव समिती व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या एकतेचा आणि संस्कृतीचा उत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर, सर्व भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
About The Author

