Spread the love

५ वी पास ते उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी; नामांकित कंपन्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे भव्य ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या या रोजगार मेळाव्यात पाचवी पास उमेदवारांपासून ते उच्चशिक्षित तरुणांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या विशेष पुढाकाराने तसेच अनुप मोरे, तुषार हिंगे आणि जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाला मा. रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Axis Bank, ICICI Bank, Tata Motors, Hudas Technology, Wiggle Space, Bajaj आणि Hyundai यांसह विविध कंपन्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पदवीधर किंवा उच्चशिक्षित उमेदवारांपुरतेच त्याचे स्वरूप मर्यादित नसणार आहे. पाचवी, दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांनाही त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महामेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला तात्काळ नोकरी मिळेलच असे नाही. मात्र, अशा उमेदवारांना रोजगाराच्या पुढील संधींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आयोजकांकडून ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराची आवश्यकता यांची माहिती संकलित केली जाणार आहे. भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संबंधित रोजगाराच्या संधींशी या उमेदवारांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगार व स्वयंरोजगाराची संधी’ हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार महाकुंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, आवश्यक प्रमाणपत्रे आणि अपडेटेड बायोडाटा (Resume) सोबत घेऊन मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी वेळेत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अनुप मोरे (अध्यक्ष, अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन), तुषार हिंगे (अध्यक्ष, आरंभ सोशल फाऊंडेशन) आणि जयदीप खापरे (अध्यक्ष, टीम पिंपरी-चिंचवड) यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *