BHMS डॉक्टरकडून ॲलोपॅथी उपचार केल्याचा आरोप; रिक्षाचालकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची शिवशाही शासन पक्षाची मागणी

पुणे : प्रतिनिधी
रावेत येथील OJAS MULTISPECIALITY HOSPITAL मधील उपचारपद्धती आणि डॉक्टरांच्या पात्रतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, एका रिक्षाचालकाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख युवराजगिरी दाखले यांनी केली आहे. संबंधित डॉक्टरांकडे BHMS पदवी असताना ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष आणि रिक्षाचालक अनिल श्रीपत तांबे यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना रावेत येथील OJAS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तसेच उपचारातील कथित त्रुटींमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने उपचार करण्यात आले, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची पात्रता काय आहे, त्यांचे संबंधित वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र वैध आहे का आणि हॉस्पिटलला आवश्यक परवाने आहेत का, याची अधिकृत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
BHMS ही होमिओपॅथी शाखेतील वैद्यकीय पदवी आहे. संबंधित डॉक्टरांकडून ॲलोपॅथी उपचार, सलाईन, इंजेक्शन, अँटिबायोटिक्स तसेच रुग्णांना दाखल करून उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यात आली का, याची तपासणी करण्याची मागणी दाखले यांनी केली आहे. या आरोपांची वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. OJAS हॉस्पिटलसह रावेत परिसरातील BHMS डॉक्टरांकडून चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटल्स व उपचार केंद्रांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे, मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी, क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंटसंबंधी परवाने आणि उपचार करण्याचा कायदेशीर अधिकार यांची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशीत नियमभंग अथवा बेकायदेशीर वैद्यकीय उपचार आढळल्यास संबंधितांवर लागू कायद्यानुसार कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सील करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सात दिवसांच्या आत प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास शिवशाही शासन पक्ष आणि मातंग समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवराजगिरी दाखले यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन अनिल तांबे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि उपचारांमध्ये काही निष्काळजीपणा अथवा नियमभंग झाला होता का, हे स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
About The Author

