Spread the love

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ४,११२ ढोलांचा विक्रमी निनाद; तीन ठिकाणी एकाचवेळी पाच मिनिटांचे शिस्तबद्ध वादन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी :

ढोल-ताशांचा गजर, शंखनाद, शिव-शंभूंचा जयघोष आणि राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी रविवारी पिंपरी-चिंचवडचा आसमंत अक्षरशः दुमदुमून गेला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो वादकांनी अनोखी मानवंदना अर्पण करत ४ हजार ११२ ढोलांच्या सामूहिक वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. मोशी, स्पाईन रोड तसेच वाघेश्वर मंदिर, चऱ्होली या तीन ठिकाणी एकाचवेळी वादन करण्यात आले. यापूर्वी २ हजार ६५० ढोलांच्या सामूहिक वादनाचा विक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. तो विक्रम मोडत पिंपरी-चिंचवडने नवा विक्रम आपल्या नावे केला.

विश्वविक्रमासाठी सहभागी वादकांना तीन संधी देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एकाचवेळी सलग पाच मिनिटे ढोल वाजविताना वादनातील शिस्त, तालबद्धता आणि समन्वय कायम ठेवणे आवश्यक होते. विविध ढोल-ताशा पथकांतील हजारो वादकांनी या कसोटीला सामोरे जात एकसंध ठेका साधला. महाराष्ट्राच्या पारंपरिक रणवाद्य संस्कृतीचे सामर्थ्य या माध्यमातून अधोरेखित झाले.

सोहळ्याला शिवशंभो गर्जना, मर्दानी खेळ, शाहिरी सादरीकरण आणि विशेष कवितांची जोड मिळाली. शाहीर चंद्रकांत माने तसेच शाहीर खुपिरे यांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. १११ शंखांच्या सामूहिक शंखनादानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसरात उत्साह संचारला.

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबत निर्माणाधीन १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजालाही यावेळी मानवंदना देण्यात आली. भारतमातेची आकर्षक रंगावली, शिव-शंभूंच्या पराक्रमाचे सादरीकरण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘गोमाता सन्मान अभियान’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ याबाबतही जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. आमदार महेश लांडगे यांनी उपस्थितांना संबोधित करत संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्याचे आवाहन केले.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी या विश्वविक्रमाचे श्रेय सहभागी सर्व वादक, पथकप्रमुख, स्वयंसेवक, सहकारी आणि संस्कृतीप्रेमी नागरिकांना दिले. शिव-शंभूंच्या विचारांपासून प्रेरणा घेत सांस्कृतिक वारसा जपतानाच व्यसनमुक्त आणि जागरूक समाजनिर्मितीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पुढील वर्षी रविवार, १९ सप्टेंबर २०२७ रोजी याच ठिकाणी अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *