वरिष्ठ उपाध्यक्षपदानंतर सरचिटणीसपदी नियुक्ती; संघटन बळकटीसह जनसंपर्क वाढविण्यावर भर
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीत संजय पटनी यांच्यावर आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पटनी यांनी यापूर्वी प्रसिद्धीप्रमुख तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेत जबाबदारी सांभाळली आहे.
गेल्या दोन दशकांपासून पटनी हे आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याशी जोडलेले आहेत. पक्षाचे विविध कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम तसेच भाजपा परिवारातील संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. शहरातील राजस्थानी, मारवाडी आणि हिंदीभाषिक समाजातील विविध घटकांशी असलेल्या संपर्कामुळे संघटनात्मक कामात त्यांना व्यापक जनसंपर्काचा अनुभव असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
बूथ पातळीवरील संघटनात्मक कामातही पटनी यांनी सहभाग घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४८३ बूथवर सलग चार महिने ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात त्यांच्या पुढाकाराचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे बूथस्तरावरील कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचा अनुभव त्यांना मिळाला.
नियुक्तीनंतर आमदार महेश लांडगे यांनी पटनी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या दीर्घकाळच्या पक्षकार्याचा आणि संघटनात्मक अनुभवाचा शहर भाजपाला उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन दशकांतील सहकार्य आणि पक्षकार्याची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचे लांडगे यांनी नमूद केले.
नवीन जबाबदारी स्वीकारताना संजय पटनी यांनी पक्षनेतृत्व, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, विविध समाजघटकांशी संवाद वाढविणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणे याला प्राधान्य राहील, असे पटनी यांनी सांगितले.
यावेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, नगरसेवक उदय गायकवाड, नगरसेवक सागर गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“ही जबाबदारी माझ्यासाठी विश्वासाची आहे. पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्षाने दाखविलेला विश्वास कार्यातून सार्थ ठरवेन,” असे संजय पटनी यांनी सांगितले.
About The Author


