Spread the love

नागरिकांच्या सुरक्षेसाठी विनोद वरखडे पाटील यांचे महापालिका प्रशासनाला निवेदन

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सोसायट्यांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना घाबरवणे तसेच कुत्रा चावण्याच्या घटना घडत असल्याने या समस्येवर महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे पाटील यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत सोसायटी परिसरातील भटक्या कुत्र्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच निर्बिजीकरण आणि लसीकरणाची विशेष मोहीम राबवून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोसायट्यांच्या परिसरात लहान मुले खेळत असताना तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवासी सकाळ-संध्याकाळ फिरत असताना भटक्या कुत्र्यांचा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आक्रमक कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने नियमांनुसार तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढण्यामागे उघड्यावर पडणारा अन्नकचरा आणि अस्वच्छता हेही एक कारण असल्याने सोसायट्या व परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे वरखडे पाटील यांनी म्हटले आहे. अन्नकचरा उघड्यावर पडणार नाही, यासाठी संबंधित विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन अथवा प्रभावी तक्रार नोंदणी व्यवस्था निर्माण करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने निश्चित कालमर्यादेत घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असल्यास नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष उपाययोजना करून त्याचा अहवाल संबंधित नागरिकांना देण्याची मागणी वरखडे पाटील यांनी केली.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन, निवेदन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी निवेदन देताना प्राईम पेस्ट कंट्रोलचे मालक संतोष मायने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *