अभिजात मराठी भाषा सप्ताहात दोन नाट्यप्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह रसिकांच्या गर्दीने हाऊसफुल
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
हास्याचे फवारे, मैत्रीतील जिव्हाळा, बदलती नाती आणि प्रेम-विवाहाबाबतच्या नव्या पिढीच्या अपेक्षा… या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘वरवरचे वधू-वर’ या दोन नाटकांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडकर रसिकांना खिळवून ठेवले. दोन्ही प्रयोगांना प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी झाली. कलाकारांच्या अभिनयाला मिळालेल्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे संपूर्ण प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा परिचय नागरिकांना व्हावा, तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहांतर्गत दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल दि बेस्ट’ या विनोदी नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या अभिनयाने नाटक रंगले. विनोदी संवाद, मिश्कील प्रसंग आणि पात्रांमधील मैत्रीच्या नात्यामुळे रसिकांना मनमुराद हसण्याची संधी मिळाली. शारीरिक अडचणींवर मात करून आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक संदेशही नाटकातून देण्यात आला. कलाकारांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने आजच्या तरुणाईच्या प्रेम आणि विवाहाकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचा वेध घेतला. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयाने नाटकाला रंगत आली. विवाहाचा निर्णय, नात्यांमधील अपेक्षा, संभ्रम आणि ‘कमिटमेंट’ स्वीकारण्यातील अडचणी यांचे विनोदी पद्धतीने चित्रण करण्यात आले. अनेक प्रसंगांत रसिकांना स्वतःच्या अनुभवांचे प्रतिबिंब दिसल्याने हास्याची लाट उसळली.
दोन्ही नाटकांनी मनोरंजनासोबतच सामाजिक आणि भावनिक आशयही प्रभावीपणे मांडला. त्यामुळे अभिजात मराठी भाषा सप्ताहातील नाट्यप्रयोगांना रसिकांचा मिळालेला प्रतिसाद मराठी रंगभूमीविषयीची त्यांची आवड अधोरेखित करणारा ठरला.
गुरुवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सकाळी ८.३० वाजता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विजय पटवर्धन लिखित ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य होणार आहे. दुपारी १२ वाजता ‘गजल आख्यान’, दुपारी ३.३० वाजता ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’, सायंकाळी ५.३० वाजता कवी वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता-गझलांचा ‘द मनमौजी’ आणि रात्री ९.३० वाजता ‘म…मराठीचा’ हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे.
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी येथे दुपारी १२ वाजता ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त ‘कथा वंगभंगाची’ या नाटकाचा प्रयोग होणार असून, सायंकाळी ५ वाजता ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गायक विनल देशमुख, वर्षा एखंडे आणि अश्विनी मिटे सहभागी होणार आहेत.
About The Author


