परांडा : प्रतिनिधी
परांडा येथे तालुक्यातील विविध गावातील शाळकरी मुलींना मोफत सायकलींचे वाटप महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व येथील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीच्या लेकींच्या भविष्याच्या दृष्टीने मोफत सायकल वाटपाचा हा उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल असा आहे.
मुलींचे सक्षमीकरण हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. मोफत सायकल वाटपाचा हा उपक्रम केवळ खेड्यातील मुली आणि त्यांचे शिक्षण यांच्यातील दरी कमी करणार नाही, तर त्यांना स्वावलंबी करणारा ठरणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या राबवलेल्या या उपक्रमाचे महत्त्व बहुमोल आहे, अशी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत म्हणाले.
आरोग्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, शाळेपासून दूर राहणाऱ्या मुलींसाठी राबविण्यात येणारा हा मोफत सायकल वाटपाचा उपक्रम इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील मुलींचे परिसरातील शाळेशी असलेले रोजचे दळण वळण आता अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
यावेळी परांडा तालुक्यातील उत्कृष्ठ शैक्षणिक कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रसंगी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.