तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
नानासाहेब पेशवे यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीने रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट परिसर वेणगाव (कर्जत) येथे भव्य सोहळा संपन्न झाला.
या निमित्ताने इतिहास प्रेमी मंडळाने देखील पुणे ते वेणगाव (कर्जत) अशी नानासाहेब पेशवे रथयात्रा आयोजित केली होती. त्यामधे किल्ले रायगड व शनिवारवाडा येथील पवित्र जलकलश नेण्यात आले होते.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. पुष्पाहार अर्पण करून गाजत वाजत व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, संदीप गाडे, बसप्पा भंडारी, प्रदीप टेकवडे, रो. दीपक फल्ले, अमित पोतदार, संतोष परदेशी, मल्हार टेकवडे, महेंद्र पानसरे, विराज शिरोडकर, बाळासाहेब राक्षे, बाळा कसाबी, समीर टेकवडे, शंकर भेगडे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
वेणगाव येथे आयोजित समारंभ स्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शस्त्र व क्रांतिकारक छायाचित्रे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की, नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी याच ठिकाणी झाला होता. सन १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य संग्रामात नानासाहेब पेशवे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची दूरदृष्टी, संघटन कौशल्य, धाडस, अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी व प्रखर राष्ट्रभक्ती या गुणांमुळे हा संग्राम सर्वव्यापी होऊ शकला. या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे व प्रशांत ठाकूर, पेशव्यांचे वारसदार पुष्कर पेशवे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. नानासाहेब पेशव्यांना मानवंदना देण्यासाठी वेणगाव येथे मावळ तालुक्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.