तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ एका जाती धर्मात बांधून चालणार नाही तर ते सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे कैवारी होते. मी जन्मतः भारतीयच आहे आणि अंततः ही भारतीयच आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना हा सर्वांना समान न्याय, बंधुता आणि हक्क प्रदान करणारा कालातील दस्तऐवज निर्माण करून ठेवला आहे.”
असे उद्गार ॲड. मधुकर रामटेके यांनी काढले. ते नुकत्याच 6 डिसेंबर रोजी निलया सहकारी सोसायटीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी निलया सहकारी सोसायटीच्या सचिव फातिमा शेख, संचालक मंडळातील सभासद आणि सोसायटीतील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्ध वंदनेने अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याचा वेध घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर वडगाव मावळ न्यायालयात कार्यरत असलेले व निलाय सोसायटीतील रहिवासी ॲड. मधुकर रामटेके यांनी भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यघटनेतील निवडक कलमांचा उपस्थितशी संवाद साधला.
पुढे रामटेके म्हणाले, “घटनेत महत्त्वाचे तीन मार्गदर्शक तत्वे सांगितले आहेत, एक, शासनाने कसे काम करावे, दोन, न्यायदान कसे करावे आणि तीन, सर्वसामान्य नागरिकांना लाभ कसा मिळावा.
ज्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर लढले ते हक्क बाबासाहेब आंबेडकर हयात असताना मान्य झाले नाही ते हक्क बाबासाहेब गेल्यानंतर अस्तित्वात आले. ते म्हणजे हिंदू कोडबिल, कुळकायदा आणि महार वतन खालसा करणे ही होत.
सत्तर वर्षांपूर्वी गमावलेली मालमत्ता आजही या कायद्यान्वये गोरगरिबांना पुन्हा मिळवता येते, हेच ह्या कायद्याचे यश आहेत. बाबासाहेब आंबेडकर ७ नोव्हेंबरला पहिल्यांदा शाळेत दाखल झाले, तो दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून पाळला जात असल्याची आठवणी ॲड. रामटेके यांनी करून दिली.
प्रा. डॉ. करुणा भोसले यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावरील चित्रफीत दाखवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. यावेळी सोसायटीच्या सचिव फातिमा शेख यांना तळेगावनगरीच्या वतीने देण्यात येणारा ‘संविधान योद्धा’ हा सन्मान मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संग्राम गायकवाड काका, क्षितिज सोनवणे, विद्या शिंदे आणि सहकारी यांनी नियोजन कामात पुढाकार घेतला.
यावेळी सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. संदीप कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर आभार सुधाकर मोरे यांनी मानले.