तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्या विरोधात कुसगाव, डोंगरगाव येथील ग्रामस्थ यांचे हंडामोर्चा आंदोलन आणि उपोषण नुकतेच ओळकाई वाडी चौकात करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पुणे विभाग –२ यांना ग्रामस्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात पूर्ण झालेल्या टाक्यामध्ये पाणी भरावे आणि लोकांना पाणी सोडावे, जल जीवन मिशनच्या ठेकेदारानी जी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत त्याची चौकशी करून थर्ड पार्टी ऑडिट करून ग्रामपंचायत कुसगाव बुद्रकला अहवाल सादर करावा.तसेच ज्या लोकांना आज पर्यंत व्यवस्थित पाणी मिळाले नाही. त्या सर्व लोकांच्या पाणी पट्ट्याची बिल माफ करावी पाईप लाईनचे काम करत असताना पूर्ण ग्रामपंचायत मधील ज्या रस्त्यांची गटारांची मोड तोड केली ते पूर्ववत करणे, उरलेल्या वाड्या वस्त्यांवर पाईप लाईन टाकून पूर्ण करावी आणि राज्य शासना कडून पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य लाईन वलवन पंपा वरून सिंहगड टाकी पर्यंत ६ MLD पाणी खेचण्याची तरतुदीची मंजुरी आपण शासन कडून मिळून द्यावी आणि पुढील ६ महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात मिळावे, अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत उपोषण करण्याचा पवित्रा कुसगावचे उपसरपंच सुरज केदारी आणि ज्ञानेश्वर गुंड आणि ग्रामस्थानी घेतला आहे. यावेळी महिला हंडा मोर्चा काढत ओळकाईवाडी येथे रास्ता रोको करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
डिसेंबर अखेर पाणी योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्राधिकरण कडून देण्यात आले. तरी ग्रामस्थ यांचा प्रशासनावर विश्वास नसल्याने उपोषणाचा करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.
यावेळी कुसगाव ग्रामपंचायत च्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, डोंगरगावचे सरपंच सुनील येवले,माजी सरपंच भगवान डफळ,शिवसेना उबाठाचे आशिष ठोंबरे,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.