तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगावचे सुपुत्र मकरंद प्रकाश जोशी यांच्या नेतृत्वाखाली “रिन्यू” कंपनीच्या उत्तराखंड येथील सिंगोली भटवारी हायड्रो पॉवर प्लांटने, अतिशय मानाचा असणारा “स्वॉर्ड ऑफ ऑनर ” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला आहे. औद्योगिक सुरक्षा, स्वास्थ्य व कल्याण (वेलबिईंग) या क्षेत्रातील उत्कृष्टतेकरिता हा पुरस्कार ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल द्वारे दिला जातो. दिनांक २९ नोव्हेंबरला लंडन येथील डॆॄपर्स हॉलमध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ अतिशय दिमाखात पार पडला. यामध्ये रिन्यू कंपनीचे श्री मकरंद जोशी (प्लांट हेड) व श्री परेश ठक्कर (HSE हेड) यांना, ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलचे चीफ एक्सयूक्युटीव्ह श्री माईक रॉबिन्सन यांच्या हस्ते ही मानाची तलवार देण्यात आली. हा पुरस्कार पटकावणारा “सिंगोली भटवारी” हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला हायड्रो पॉवर प्लांट ठरला आहे. यामुळे रिन्यू कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला गेला आहे.
मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हायड्रो टीम ने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन, अतिशय प्रयत्नपूर्वक औद्योगिक सुरक्षा, स्वास्थ्य व कल्याण या क्षेत्रातील गुणवत्तेचा स्तर आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत उंचावला. कामकाजातील सर्व प्रक्रियांचे उत्तम डॉक्युमेंटेशन करून त्याबरोबरच त्याच्या प्रत्यक्ष अम्मलबजावणीमध्ये सर्व टीमला सहभागी केले व त्यातून आदर्श असे सुरक्षित व्यावसायिक वातावरण (सेफ वर्क कल्चर ) निर्माण केले. या उत्कृष्ट टीमवर्कमुळे ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलच्या ऑडिटमध्ये सर्वोत्तम अशी पंचतारांकित श्रेणी प्राप्त केली व त्यानंतर “स्वॉर्ड ऑफ ऑनर ” हा बहुमान मिळवला. या अभूतपूर्व यशाबद्दल रिन्यू कंपनीचे सीईओ श्री सुमंत सिन्हा यांनी हायड्रो टीमची पाठ थोपटली आहे.
मकरंद प्रकाश जोशी यांचा तळेगावातील कलापिनी, रा स्व संघ, सृजन व इतर अनेक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. विद्युत निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी तसेच हिमाचल प्रदेश, सिक्कीम व उत्तराखंड येथील हायड्रो प्लांटमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. एक इंजिनीयर म्हणून सुरवात करून ते आता रिन्यू कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट असून, उत्तराखंडमधील हायड्रो प्लान्टचे “प्लांट हेड” म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने तळेगावची मान निश्चितच उंचावली आहे.