
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये वृक्षारोपण आणि पालक मार्गदर्शन मेळावा झाला. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस एक वर्षाच्या लहानग्या कडून वृक्षारोपण करून शाळेतील हरित अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर म्हणाले, ” वृक्षारोपण हे केवळ एक उपक्रम नाही तर पर्यावरणसंवर्धनाची एक जबाबदारी आहे.मुलांना नैतिक मूल्ये, संस्कृती आणि निसर्गाशी जोडणे हे आमचे ध्येय आहे. मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा देशमुख म्हणाल्या, ” सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रम, NEP २०२० अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षण, जीवनकौशल्ये, कलेच्या माध्यमातून शिक्षण, स्पर्धात्मक परीक्षा, एआय आणि रोबोटिक्स यांचे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रुति अत्रे,वर्षा देशपांडे टेक्निकल असिस्टेंट निलाक्षी अत्रे यांनी केले.
या शैक्षणिक वर्षात शाळेत विविध उपक्रमावर भर आहे.योग, संगीत, चित्रकला, मल्लखांब, अबॅकस, शारीरिक शिक्षण – यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी स्वतः केले. पालकांनीही शाळेच्या भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आधारित शिक्षण,नैतिक शिक्षण व मूल्यसंवर्धन,पालक-शिक्षक सुसंवाद, विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासावर भर,पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व या उपक्रमावर भर देण्यात येणार आहे. पालक व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण करून ‘हरित शाळा, समृद्ध भविष्यासाठी’ हा संकल्प घेतला.
About The Author

