Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे शहरातील जुन्या आणि मोठ्या झालेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधत, तळेगावचे माजी नगराध्यक्ष श्री. रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे तातडीने धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा दाखला देत, दाभाडे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि संभाव्य वित्तहानीचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

गेल्या १६ जून २०२५ रोजी नाना भालेराव कॉलनी येथे डॉ. देशमुख आणि सुनील जैन यांच्या घरांवर एक जुने झाड कोसळले. या दुर्घटनेत इमारतीचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील वाढलेल्या आणि धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर, दाभाडे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले आहे. त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, तळेगाव स्टेशन, सिध्दीविनायक सोसायटी, वतननगर आणि आनंद नगर परिसरातील १९७० ते १९८० च्या दशकात लावलेली निलगिरी आणि अन्य झाडे आता मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. “या झाडांवरील फांद्यांचे वजन वाढल्याने आणि ती जीर्ण झाल्याने, पावसाळ्यात ती कधीही कोसळू शकतात. यामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे,” असे दाभाडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दाभाडे यांनी प्रशासनाकडे तातडीने परिसराची पाहणी करून, अत्यंत धोकादायक झाडे तोडण्याची आणि इतर झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याची कळकळीची विनंती केली आहे. भविष्यात असे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. माजी नगराध्यक्षांनीच या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे, नगरपरिषद यावर कधी आणि कोणती कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *