Spread the love
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांत वन विभाग वडगाव मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एकूण ९ अजगरांना वेगवेगळ्या भागांतून यशस्वीरित्या वाचवून सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक साप बिळांतून बाहेर पडत आहेत. यामध्ये घोणस सापाची पिलेही आढळून आली आहेत. या दोन्ही प्रमुख संस्थांनी मानवी वस्तीत आढळलेल्या सापांना वेळेवर वाचवले. वाचवलेल्या अजगरांमध्ये ९ ते १० फुटांपर्यंतचे मोठे अजगर, तसेच १.५ फुटांपर्यंतची छोटी पिले होती. लोणावळा परिसरात रस्ता ओलांडणारा एक मोठा अजगर आढळला, मात्र त्याला रेस्क्यूची गरज नव्हती. एका सोसायटीमध्ये चार पिलांचे आढळून येणेही नोंदवले गेले.
या सर्व अजगरांना पकडून वन विभागामार्फत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. संपूर्ण मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सचिव सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शत्रुघ्न रासनकर, अनिल आंद्रे, संतोष दहिभाते, नागेश कदम, रमेश कुंभार, जिगर सोलंकी, निनाद काकडे, मनोहर ढाकोळ, गणेश कालेकर, आदिनाथ पडवळ यांनी बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहभाग घेतला.
याशिवाय, स्थानिक रहिवासी मोहन वरघडे, अभि वरघडे, विशाल वरघडे, अजिंक्य वरघडे, एकनाथ शिंदे आणि अमोल मोहोळ यांनी वेळेवर माहिती दिल्याने या वन्यजीवांचे प्राण वाचवण्यास मदत झाली.
वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून राबवले गेलेले हे वन्यजीव बचाव अभियान निश्चितच कौतुकास्पद आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *