
लोणावळ्यात शाळांना देण्यात आले राज ठाकरे यांचे पत्र
लोणावळा : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवत शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी एक परखड पत्र लिहिले आहे. हे पत्र राज्यभरातील शाळांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय मनसेने घेतला असून, लोणावळ्यातही विविध शाळांमध्ये ते सुपूर्त करण्यात आले.
विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि पक्षनेते बाबू वागसकर यांच्या सूचनेनुसार, लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळांना भेट देत हे पत्र दिले.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात शिक्षण विभागाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. एप्रिलपासून मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मनसेच्या विरोधानंतर सरकारने हिंदी सक्ती नसेल असे जाहीर केले, मात्र याबाबत कोणताही लेखी आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
त्याचबरोबर तिसऱ्या भाषेच्या पुस्तकांची छपाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला असून, सरकार छुप्या मार्गाने मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, मराठी ही राज्यभाषा आणि इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा म्हणून पुरेशा आहेत. लहान वयातील विद्यार्थ्यांवर अनावश्यक भाषेचे ओझे लादणे हे त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अडथळा ठरू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून उत्तर भारतातील प्रादेशिक भाषा असल्याने ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर लादणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.
शाळांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे. जर हिंदी सक्तीचा लेखी आदेश सरकारने दिला नाही, आणि शाळांनी स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत केली, तर अशा कृतीकडे ‘महाराष्ट्र द्रोह’ म्हणून पाहिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांचे पत्र शाळांमध्ये सुपूर्त करताना मनसेचे उपाध्यक्ष दिनेश कालेकर, माजी प्रवक्ते अमित भोसले, संघटक अभिजित फासगे, निलेश लांडगे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, सुभाष रेड्डी, कैवल्य जोशी, श्रेयस केदारी, किशोर साठे, सौरभ कराळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
