
अपघातांसह गुन्हेगारीचा धोका वाढला
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि चाकण-तळेगाव महामार्गांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडणाऱ्या वर्दळीच्या उर्से खिंडीत गेल्या पंचवीस वर्षांपासून पथदिवे नसल्याने अपघातांसह गुन्हेगारीचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी हा दीड किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे अंधारात असल्याने नागरिक, कामगार आणि वाहनचालक भीतीच्या छायेखाली प्रवास करत आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अस्तित्वात आल्यापासून उर्से खिंड हा एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. उर्से औद्योगिक पट्ट्याकडे जाण्यासाठी तसेच पुणे आणि मुंबईला जोडण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दररोज शेकडो लहान-मोठी वाहने, दुचाकी आणि बसेस येथून ये-जा करतात. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत.
रात्रीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य आणि अंधारात असल्याने कामगारांना तसेच इतर वाहनचालकांना असुरक्षित वाटते. या अंधाराचा फायदा घेऊन येथे यापूर्वी वाटमारीचे अनेक गुन्हे घडले आहेत, तर याच ठिकाणी एका कामगाराचा खून झाल्याची गंभीर घटनाही घडली आहे. त्यामुळे रात्रपाळीवरून ये-जा करणाऱ्या कामगारांना विशेषतः मोठा धोका निर्माण झाला आहे.
उर्से, वडगाव आणि तळेगाव येथील नागरिकांसह येथून प्रवास करणाऱ्या कामगारांनी आणि वाहनचालकांनी रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) तातडीने उर्से खिंडीत पथदिवे बसवण्याची मागणी केली आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आयआरबी मार्फत उर्से खिंड रस्त्यावर पथदिवे बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
About The Author

