
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी रोटरी वर्ष १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत विविध माध्यमांतून दोन कोटी ९७ लाख रुपयांचे प्रकल्प केल्याची माहिती अध्यक्ष कमलेश कारले यांनी दिली.
१९९३ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी गेल्या ३२ वर्षांत तळेगाव व मावळ परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. यामध्ये सामूहिक विवाह सोहळा, गॅस शव वाहिनी, वॉटर फिल्टर, आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा यांचा समावेश आहे. मागील वर्षी मावळ परिसरात चार अंगणवाड्या, मुलींचे स्वच्छतागृह व उपजिल्हा रुग्णालय येथे तीन डायलिसिस मशीन व आरो प्लांट हे प्रकल्प राबविले.
यावर्षी कमलेश कारले यांच्या नेतृत्वात व सर्व माजी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ब्रेस्ट स्क्रीनिंग आणि ऑपरेशन यासाठी ५० लाख रुपयांची ग्लोबल ग्रँट तसेच लहान मुलांच्या हृदय विकार शस्त्रक्रियेसाठी ३३ लाख रुपयांची दुसरी ग्लोबल ग्रँट मिळवली. सीएसआर ग्रँट अंतर्गत शिवणे शाळेतील स्वच्छतागृह व वर्ग खोली, कांतीलाल शाह विद्यालय (तळेगाव दाभाडे) सौर ऊर्जा प्रकल्प आणि गणेश मोफत वाचनालय (तळेगाव दाभाडे) सौर ऊर्जा प्रकल्प असे एकूण ४५ लाख रुपयांचे प्रकल्प केले. याशिवाय सीएसआर अंतर्गत इंगळून आणि आंबेगाव येथील अंगणवाडी प्रकल्पासाठी २१ लाख ८२ हजार रुपये, मावळ परिसरात महिलांची मोफत तपासणी व्हावी यासाठी ओनकोलाईफ हॉस्पिटल येथे कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनसाठी ३९ लाख रुपये, सडवली, कोथूर्णे आणि धामणधरा येथील अंगणवाडी प्रकल्प तसेच अॅड. पु. वा. परांजपे शाळेतील मुलांचे शौचालयासाठी ३१ लाख ४२ हजार रुपये आणि नवीन समर्थ विद्यालय स्मार्ट बोर्ड, एकविरा विद्या मंदिर (कार्ला) आणि छत्रपती शिवाजी विद्यालय (कान्हे) येथे १० लाख ९६ हजार रुपयांचे प्रकल्प करण्यात आले. एकूण सीएसआरचा खर्च १ कोटी ३ लाख रुपये इतका झाला.
याशिवाय सीएसआर सिनर्जी अंतर्गत दहा शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात आले. यामध्ये आदर्श विद्यामंदिर (तळेगाव दाभाडे), प्रतीक विद्यालय (निगडे), भैरवनाथ विद्यालय (वराळे), नर्सिंग स्कूल (वराळे), अनिकेत निकेतन (तळेगाव दाभाडे), पैसा फंड अ (तळेगाव दाभाडे), पैसा फंड ब (तळेगाव दाभाडे), रामभाऊ परुळेकर शाळा (तळेगाव दाभाडे), इंद्रायणी महाविद्यालय (तळेगाव दाभाडे) आणि नवीन समर्थ विद्यालय (तळेगाव दाभाडे) यांचा समावेश आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पावर ४४ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च झाला. त्याचबरोबर २१ लाख ६२ हजार रुपयांचे इतर वैद्यकीय व शैक्षणिक प्रकल्प राबविण्यात आले.
एकूण दोन कोटी ९७ लाख रुपयांचे प्रकल्प रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगाव व मावळ परिसरात राबविण्यात आले असून, येत्या काळात समाजोपयोगी आणखी उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष कमलेश कारले यांनी सांगितले.
About The Author

