
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
पवना धरण क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद होत असून, धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढीस लागला आहे. शुक्रवार (दि. २७ )जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पवना धरणाचा साठा ५४.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आगामी काळात पाणीटंचाईची भीती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे.
१ जूनपासून आतापर्यंत एकूण ७४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे साठ्यात तब्बल ३४.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.
तुलनात्मकदृष्ट्या पाहता, गेल्या वर्षी २७ जून २०२४ रोजी धरणाचा साठा केवळ १७.६७ टक्के होता, तर एकूण पावसाची नोंद मात्र तब्बल ३६३६ मि.मी. इतकी झाली होती. यंदा कमी पावसातही साठा अधिक झाल्याने धरणक्षेत्रातील जलसंधारणाचा परिणामकारकपणा अधोरेखित होत आहे.
तळेगाव, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही परिस्थिती दिलासादायक मानली जात आहे. मात्र, आगामी काळात नियमित पाऊस पडणे आवश्यक असून, नागरिकांनी पाण्याचा वापर संयमाने व काटकसरीने करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
About The Author

