
विद्यार्थ्यांच्या सहभागाने आरोग्य जनजागृती
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने “हर रविवार होगा डेंग्यू पर वार” या विशेष आरोग्य जनजागृती उपक्रमाची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून कुटुंबांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
बुधवार (दि. २) जुलै २०२५ रोजी नगरपरिषद कार्यालयात नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी डेंग्यू आणि मलेरियामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर चिंता व्यक्त करत, यावर ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.
या उपक्रमांतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष आरोग्य पत्रक वितरित केले जाईल. या पत्रकानुसार, दर रविवारी विद्यार्थ्यांना घरी एक छोटी आरोग्यविषयक कृती करायची आहे. यामध्ये घरातील पाणीसाठा तपासणे, परिसराची स्वच्छता राखणे, पाणी साठवणाऱ्या वस्तू नष्ट करणे आणि भांडी कोरडी ठेवल्याची खात्री करणे, अशा कामांचा समावेश आहे. शिक्षकांनी दर सोमवारी विद्यार्थ्यांकडून या कृतींची तपासणी करायची असून, त्यांना डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शालेय शिक्षण न राहता, समाजहिताची जाणीव निर्माण होईल आणि आरोग्य शिक्षणाचा भाग म्हणून हा उपक्रम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत पंचायत समिती वडगाव-मावळ येथील विस्तार अधिकारी दिलीप ठोंबरे यांनी डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक काळजीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकदा पाणी साठवणारी भांडी व टाक्या रिकाम्या करून स्वच्छ करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणी व डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे आणि पावसाळ्यात पाणी साचू न देणे यांसारख्या महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयीची जागरूकता वाढेल आणि डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने व्यक्त केली आहे.
About The Author

