Spread the love

मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश महाळस्कर यांचा आरोप

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वडगाव शहराचा पुढील वीस वर्षाचा नियोजित विकास साधण्यासाठी नुकताच प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, तो पूर्णतः मनमानी पद्धतीने व आर्थिक हित साधून बिल्डर धार्जिणा बनविण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक अल्पभूधारक शेतकरी व वडगावातील नागरिकांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे. अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश महाळस्कर यांनी वडगाव येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तानाजी तोडकर,मच्छिंद्र मोहिते, संतोष म्हाळसकर,महेंद्र शिंदे, विकास साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगररचना विभागाकडून वडगाव नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा सर्व नगर सदस्यांच्या समोर खोलण्यात आला. मात्र तो विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी करण्यात आलेले ९९ बदल हे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व त्यांना न सांगता मा. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी परस्पर आर्थिक हित साधून केले व ८ ऑगस्ट २०२३ रोजी नगरसेवकांची ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर आराखडा प्रसिद्ध केला.

वडगाव नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्याच पंचवार्षिक काळात विकास आराखडा तयार करण्याची गरज नक्की कोणाला भासली यातून कोणाचे आर्थिक हित साधले. निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला.

वडगाव नगरपंचायत स्थापने दरम्यानच्या महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नगरपंचायतीचा विकास आराखडा हा तयार झालेला नाही मग वडगावचा विकास आराखडा घाई घाई का करण्यात आला व बॉडी बरखास्तीच्या काळातच प्रसिद्ध करण्यात आला.

मोनार्च एजन्सी यांनी अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला असून सॅटेलाईट व प्रत्यक्ष स्थळ पाहणी सर्वे पूर्णतः चुकीचा केला आहे.

केतकर समिती पुढे एकूण ६५० हरकती व सूचना मांडण्यात आल्या. मात्र त्या हरकती औपचारिकता म्हणून ऐकून घेण्यात आला.

महागड्या गाड्यांमध्ये कोणकोण ये-जा करत होते, ज्या हॉटेल मध्ये मिटींग झाली त्याचे CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्या दरम्यान अनेक मोठ्या बिल्डरांनी पैसे देऊन आरक्षण बदलून घेतले.

१६ जून २०२५ सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. एकूण हरकती पैकी फक्त ४३ आरक्षणात बदल करण्यात आले.

कोविड काळात ज्या महावीर भवनातून गोरगरिबांना वडगाव नगरपंचायतने दोन वेळ अन्न शिजवले व पुरवले त्याच पवित्र जैन स्थानकावरती काही लोकांनी
आरक्षण टाकून त्यास अपवित्र करण्याचे काम केले.

सार्वजनिक शौचालय व इतर धार्मिकस्थळे विकास आराखड्यामध्ये पब्लिक, सेमी पब्लिक झोन मध्ये दर्शवण्यात आली मात्र महावीर भवन दाखवण्यात आले नाही. या उलट त्यावर आठवडा बाजाराचे आरक्षण टाकण्यात आले. यात काही लोकं मतांच राजकारण करण्यासाठी या सर्व गोष्टी करत आहे. एक बाजूला जैन धर्माची सहानुभूती मिळवण्यासाठी गोशाळा सुरू करायच्या आणि दुसरीकडे मात्र त्यांची आस्था असणाऱ्या पवित्र महावीर भावना वरती आरक्षण टाकायचे या गोष्टी आता जैन धर्मातील आमच्या लोकांनी ओळखल्या आहेत.

संदीपजी बाफना यांच्या मालकीची गट नं-१९३ या जागेवर पार्किंग झोन आरक्षण टाकण्यात आले. पवित्र साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच जागेवर जैन भागवती दीक्षाचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला त्याच पुण्यभूमी वरती राजकीय सूडबुद्धीने व आर्थिक फायद्यासाठी आरक्षण टाकण्यात आले.

गावठाण हद्दीतील उप रस्त्यांची रुंदी कमी करण्यात यावी. गणेश मंदिर ते शिवाजी चौक, रेल्वे हद्द ३० मीटर, दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती

वडगाव मुख्य रस्त्याची रुंदी कमी करणे वडगाव नगरपंचायत ते पंचायत समिती चौक १२ मीटर करण्यात यावा.

मतांच्या राजकारणासाठी जाणून बुजून काही ठिकाणी आरक्षण टाकून त्या ठिकाणचे आरक्षण काढून श्रेय लाटण्याचं काम काहीजण करत आहेत.

पाच वर्षाच्या कार्यकाळातील व विकास आराखड्याच्या माध्यमातून मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दादा व त्यांचे प्रतिष्ठान राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.

विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आंदोलन उभे करून कायदेशीर लढा दिला जाईल.

शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे होती. या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात यावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *