Spread the love

सातारा : प्रतिनिधी

येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डोळ्याच्या पापणीसंबंधी बेसल सेल कार्सिनोमा (BCC) या दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरवर इंटरस्टीशियल ब्रॅकी थेरपी या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा पध्दतीने उपचार करण्यात आले आहे.

कर्करोगाच्या पेशींची वाढ नियंत्रणाबाहेर असेल तर शरीराच्या विशिष्ठ भागात पेशींच्या माध्यमातून कोबाल्टचा सोर्स दिला जातो. हा सोर्स शरीराच्या आतून दिला जातो. यालाच ब्रॅकी थेरेपी म्हणतात.

बेसल सेल कार्सिनोमा (BCC) हा डोळ्याच्या पापणीवरील सर्वात सामान्य प्रकारचा दुर्मिळ ट्युमर असून, विशेषतः सूर्यप्रकाशाला जास्त वेळ उघड असलेल्या भागांमध्ये आढळतो. खालच्या पापणीवरील ट्युमर हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे या रुग्णावर रेडिएशन थेरपीची आवश्यकता होती.

डोळ्याच्या संवेदनशील आणि रेडिएशनास संवेदनशील भागांमुळे पारंपरिक असा बाह्य किरणोत्सर्ग (External Beam Radiation) देणे कठीण होते. यामुळे, रुग्णासाठी अत्यंत अचूक आणि सुरक्षित अशी इंटरस्टीशियल ब्रॅकीथेरपी ही आधुनिक पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीमध्ये रेडिओऍक्टिव्ह स्रोत थेट ट्युमरच्या ठिकाणी ठेवले जातात, ज्यामुळे आजुबाजूच्या निरोगी ऊतींना कमीत कमी इजा होते.

या उपचारामध्ये पापणी खालच्या भागाभोवती विशेष ब्रॅकीथेरपी कॅथेटर बसवण्यात आले आणि पाच दिवसांत दोन वेळा अशाप्रकारे किरणोपचार योजना आखण्यात आली. यामुळे संपूर्ण उपचार कालावधी अवघ्या आठवडाभरात पूर्ण झाला, जे पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे रुग्णाची रुग्णालयातील कालावधी, आर्थिक भार तसेच बरे होण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला.

ही उपचार प्रक्रिया डॉ. चैत्रा देशपांडे , डॉ. अमोल पवार, डॉ. शुभम निकम या सर्व रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि त्यांच्या टीमने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. या यशाबद्दल ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि अशा आधुनिक उपचारपद्धतींचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी डॉ. पुष्पा मोतलिंग व डॉ. विजय सुतार यांनी रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची जसे ती महात्मा फुले जनआरोग्य योजना, सैनिकांसाठी ईसीएचएस योजना, तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एमपीकेएवाय यांसारख्या योजनांविषयी माहिती दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *