Spread the love
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संघटनेत नुकतीच उपाध्यक्षपदी निवड झालेल्या तुषार रघुनाथ हिंगे यांनी केवळ एका दिवसातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिलेल्या पत्राद्वारे हिंगे यांनी हा निर्णय कळवला आहे.
हिंगे यांनी राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या संघटनेत कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, पद सोडल्यानंतर देखील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या वाढीसाठी ते त्याच जोमाने कार्यरत राहतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष असलेल्या हिंगे यांचा शहर पातळीवरील राजीनामा हा अचानक घेतलेला निर्णय मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या पदनियुक्तीनंतर इतक्या लवकर दिलेला राजीनामा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हिंगे यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे घेतलेला असून, त्यामध्ये कोणतेही राजकीय कारण नाही.
या घटनेमुळे शहर भाजपमध्ये नवीन पदनियुक्त्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत पक्ष संघटना नव्या उपाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *